Pages

Sunday, December 19, 2010

विठ्ठल विठ्ठल आळवी

विठ्ठल माझ्या ध्यानी मनी
सावळे रूप मनोहारी

किती गुण गायले तरी
देवा वीट नाही चित्ती

सुखे दु:खे नाम मुखी
विठ्ठल  विठ्ठल  आळवी

तुझ्याच  पायी स्थैर्य संसारी
कोण मागणे आणखी नाही

बा विठ्ठला अशीच कृपा ठेवी
मी भाबडा जीव तुझे गुण गाई !  

Sunday, December 12, 2010

भाव डोळ्यात रिते झाले

भाव डोळ्यात रिते झाले
नि अश्रु ओसंडून आले

का, केव्हा, कसे
मो शोधत राहिले

कवितेचे पान पुन्हा गहिवरले
सुन्न मनाला आळवू लागले

त्या दिशांचे तराणे
क्षितिजावरच विरले
शब्दांना  खूप वळविले
पण गीत खरे पापणीतून निखळले

शब्द तिथेच थिजले, लाजले
कारण भाव डोळ्यात रिते झाले
नि अश्रु ओसंडून आले

Saturday, November 20, 2010

जुन्या अगम्य वाटा

आठवणींच्या काळोखात
जुन्या अगम्य वाटा
भावनांच्या पानावर
निशब्द कविता

हळव्या मायभूमीवर
आशांचा कोसळता मनोरा

अथांग सागरावर
भयाण लाटा

का दिसतात आठवणींच्या काळोखात
जुन्या अगम्य वाटा?

Saturday, November 6, 2010

मंगल दिनी या शिवप्रभुंचे स्मरण

अश्विन सरताना पावन भूमीवर उजळतो दिप 
तेजोमय दश-दिशा अन् प्रफुल्लित  मनं

मंगल दिनी या शिवप्रभुंचे स्मरण
प्रदिप्त समशेर अन् विक्राळ दैत्यांचे खंडण

अश्वमेध तो स्वराज्याचा अजिंक्य
इतिहासाचे सोनेरी पान वीररसाने तप्त

अंगणी सजतो लघु दुर्ग तो मनमोहक
तट, बुरुज स्मरतो प्रौढ प्रताप पुरंदर

कृपाच अशी आमुच्या दिव्य राजाची अपार
आनंदाचे हे अथांग ऋण वदतो आम्ही पामर

अभिमानी आम्ही या  थोर राज्याचे बालक
त्या तेजोदिप्त निष्णात  तलवारीचे ऋणी अन् शिवबाचे साधकSaturday, September 18, 2010

स्वप्नांविषयी थोड़ेसे

स्वप्न जेव्हा सत्यात येते
मन तेव्हा प्रश्न करते
मग सुख नेमके
कशात होते ?
--------------------------------------
प्रत्याक्षाहुन प्रतिमा
नेहमीच उत्कट
सत्य नाही
स्वप्नंच मिळतात फुकट!
--------------------------------------
एका  दीन-दुबळ्या  देशी
सारेच आहेत सुखी
कारण काय बरं ते?
साऱ्यांकडे स्वप्नांची उशी
--------------------------------------
स्वप्नं विकून ते गरिबांना
सत्यात पैसे कमावतात
नकळत फसून गरीबच श्रीमंतांना
अधिक श्रीमंत करतात
--------------------------------------
स्वप्नं दाखवूनच ते राज्य करतात
सामन्यांना लूट लूटतात
आणि तीच अपूर्ण स्वप्नं घेऊन
पुन्हा सत्तेत येतात
--------------------------------------
रंगीबेरंगी स्वप्नांचा पूर
मृगजळच ते! खूप दूर
वेडया आशांचे आरसे
लखलखतात अजून
--------------------------------------

Sunday, August 8, 2010

शब्द तेव्हा धावत येतात

मावळतीच्या गडद छटा
जेव्हा उदास वाटतात
पानांची सळसळ
संथ तराणे होते
क्षितिजावरच्या रेषा
जेव्हा धुसर होतात
शब्द तेव्हा धावत येतात...
आणि अनोखे भाव उलडगतात

Saturday, July 24, 2010

माझी झाली चारोळी

अतिशय  कमी शब्दांतून  मार्मिक अर्थ व्यक्त करणारी चारोळी मला नेहमीच भुरळ  घालत आली आहे...ती लिहिण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे.

१) माझ्या देशात लोक स्वप्नं जाळतात
त्यावर दु:खाची पोळी भाजतात
आणि पोट भरलं म्हणून
सुखाने झोपतात

२) अवती भवती हिरवळ
पानांची सुमधुर सळसळ
सूर्याचा पहिला किरण
हे स्वप्नच का केवळ ?

३) कित्येक स्वप्नांचा चुरा
इथे रोज होतो
तरीही नव्या आशांचा मनोरा
आम्ही रोज रचतो

४) चार चार ओळी लिहीताना
माझी झाली चारोळी
व्यक्त काही झाले की नाही
मी तोडली चाकोरी 

Tuesday, June 22, 2010

तू दूर कुठे ?

नील आभाळ आणि
लुकलुकते  तारे
मला साद  घालती सारे
तू  दूर  कुठे ?

स्वप्नातले गीत  आणि
सुखाचे फसवे मनोरे
त्या लाटा  अन्  ते किनारे
तू  दूर  कुठे ?

वाट पाहून  शिणले   डोळे
तू  दूर  कुठे ?

Monday, June 7, 2010

अबोली मिटताना

संध्याकाळी अबोली मिटताना
तुझे अबोल गीत बरसले
पहाटे दवबिंदु पाहताना
साद घालू लागले
पाना-पानांत फूल हसले
केशरी किरणात न्हाऊन निघाले
संध्याकाळी अबोली मिटताना
तुझे अबोल गीत बरसले...

Tuesday, May 25, 2010

भूमीपुत्राची व्यथा

काळ्या ढगाची कृपा कधी होणार?
कोरडया डोळ्यातली आस
देवा तुला कधी कळणार?

पेटत्या निखाऱ्यावर चालणारी  ती पावलं
रडवेली पोरं
अन्  राब-राबून थकलेल्या हातांची वेदना
देवा तुला कधी कळणार?

भूमीपुत्राची ही दशा 
धगधगत्या वास्तवात जळणारी त्याची आशा
या शेतात पालवी कधी फुटणार
रानात केलेलं  रक्ताचं  पाणी
देवा तुला कधी दिसणार?

भुकेचा वणवा तर अन्नदात्याच्याच पोटात
काय देवा तुझा  न्याय काही जात्यात तर काही सुपात!

Monday, April 5, 2010

तळमळ

ते  अस्थिर किनारे 
उमलून पडलेले शिंपले
आणि तरफ सूने सूने
 
चंचल लाटा
अधीर समुद्रपक्षी
आणि ओथंबलेलं  आभाळ

हळव्या मनाचे मौन
आणि आनंदाचे मृगजळ

तू नसताना होते ती हीच का
मनाची तळमळ?

Tuesday, March 16, 2010

विसरलेली गाणी

आभाळी तारे  असताना
तू जवळ नसताना
मन पिसे होताना
आणि आठवणीत  रमताना
विसरलेली गाणी
अशी साद घालतात......
परत त्या चंदेरी दुनियेत नेतात
भावस्वप्ने उलगडतात आणि
पाकळ्या होऊन विसकटतात....

Tuesday, March 2, 2010

शिवतेज

शब्दातीत  युगपुरुष तू
शौर्य, सुमेधा अन् मांगल्याचा सूर्य
या पावन भूमीचा राजा की  आत्म्याचा ईश्वर

समरांगणी  पेटल्या सहस्त्र वीर तलवारी
हर एक सूर्यशक्तीसम तुझ्या प्रज्ञेने तेजाळलेली

वैराण भूमीवर अनमोल सृष्टी चे व्रत
अखिल जगी तुझे उदात्त राज्य
साक्ष आहे शुक्ल पक्षीचा चन्द्र

आजही गहीवरे प्रत्येक माता
कधी लाभेल  मुक्तीचे पुण्य 
अन् पुत्र तुजसम त्राता

निश्चल मृतप्राय आज पुन:श्च ही भूमी
अर्जुन रक्तास हवी तुझ्या प्रेरणेची नवसंजीवनी

- अनुजा खैरे

Sunday, February 28, 2010

होळीच्या शुभेच्छा!!

उजळलेले  क्षण
रंगांनी  मोहरुन जावे,
सुखाची उधळण व्हावी
आणि मन त्यात हरखुन जावे.....

Friday, February 19, 2010

खूप काही सांगायचे राहुन गेले

तुझ्या डोळ्यातले अश्रु
माझे झाले
खूप काही सांगायचे राहुन गेले

गहिवरलेले शब्द तिथेच थिजले
व्यक्त करायचे राहुन गेले

तुला पाहताना
फक्त अश्रुच बोलले
मन मोकळ करायचे राहुनच गेले

तुझ्या शब्दांनी भरुन आलेले
कळतील का कधी तुला
माझे अव्यक्त भाव
जे तुला सांगायचे राहुन गेले

Friday, February 12, 2010

पुन्हा तारे तुटताना...!

पुन्हा तारे तुटताना
मी बालिशपणे खुप काही मागितले
काही स्वप्नं आणि खरे खुरे यत्न...
सारे डोळ्यांसमोर तरळले
तो ताराही तसाच क्रूर निघाला तर .....?

भाबडे मन ससा झाले
कावरु बावरु पिसे झाले

पुन्हा  तारे तुटताना
नको तो बालिशपणा
पुन्हा तेच मागणे
तिच निराशा
आणि पुन्हा तोच प्रश्न

तो ताराही तसाच क्रूर निघाला तर ....?

Sunday, February 7, 2010

मी कोरले काही क्षण...!

मी कोरले काही क्षण....

थोडे तुझे, थोडे माझे
थोडे उत्कट, थोडे विकल
काही बावरे, काही विफल
काही आतुर, काही अव्यक्त
काही वेडे, काही विरक्त


मी कोरले काही क्षण
आठवणींच्या पाषाणावर...

Wednesday, February 3, 2010

खुप ठरवलं

खुप ठरवलं   
स्वत:च्या वाटा  तयार करायचं
प्रवाहा विरुद्ध पोहायच
आणि क्षितीजापलीकडे पाहायचं...

आडवणाऱ्या भिंतींना तोडायचं 
खाचा खळग्यान्ना  फुलं  मानायचं 
उदात्त  धेय्यांना कवटाळlयच
आणि जगणं  सोहळl  करायचं 

जस जसं आयुष्य सुरु झालं,   
एक एक स्वप्न तुटू लागल
वास्तव समोर येऊ लागल
आणखीनच हतबल करु लागलं

पुढयात  येणारी फुलंही काटे होती
यशाला मिंधेपण होतं
आणि समृद्धिला काळी किनार होती

खुप ठरवल...
स्वप्न पुन्हा शोधायचं
पुन्हा नव्याने  जगायच
प्रवाहा विरुद्ध पोहायचं
आणि क्षितीजा पलीकडे पाहायचं

पुन्हा त्याच वाटा
तेच काटेरी यश आणि तोच हतबलपणा...

पण पुन्हा ठरवलं
खुप ठरवायचं
स्वप्न पाहात  राहायचं
सत्य चितारायचं....

Tuesday, February 2, 2010

अश्रुंचीही एक भाषा असते

गोठलेले अश्रु आज वितळले
सुन्न किनारी फिरताना मला बिलगले
खूप काही सांगू लागले,
म्हणाले,
अश्रुंचीही  एक भाषा  असते
त्या पैलतीरी जाताना ती ऐकू येते
असे किनारे ओलांडताना  .....
नवी क्षितिजे पाहताना ...
झुरताना...
कष्टताना....
सुदूर धेय्याची स्वप्ने पाहताना ....
ती खूप काही शिकवून जाते
अश्रुंचीही  एक भाषा  असते....

Thursday, January 7, 2010

चार क्षण ऊन

चार क्षण पाऊस
चार क्षण ऊन

भरजरी शालीचे
सोनेरी धागे उसवून
मी विणले हे  सक्त धागे कसे कोणास ठाऊक

थंडगार वाऱ्याची झुळ्ळूक आली
पावसाचा शिडकावा घेऊन
मी मात्र पाहीला   
घोंघावणारा वारा आणि लख्खं  ऊन

पाखरांची साद आली
मंजूळ क्षणी गात
मी मात्र ऐकले शांत तटस्थ आगाज...

अशाही रुक्ष वनात तू शोधलेस
दवबिंदू नवलाइचे
तुझ्या पोरकट स्वप्नाने केले
सारे सोहळ्याचे....

चार क्षण पाऊस
चार क्षण  ऊन
दे ना तुझे स्वप्न
देईन माझ्या उशाशी ठेवून...

Sunday, January 3, 2010

विरह

धूसर  होणाऱ्या पायवाटा
आणि घननीळ समुद्राचा  आगाज
त्या नीरव  शांततेत
तुझ्या आठवाने कंपित होणारे  हृदय.....
त्या घननादाच्या दिशेने माझे अकल्पित जाणे
तुझ्या-मुळच विदीर्ण झालेल्या मनाचे
पुन्हा तुझ्याच ओढीने
अधीर होणे ....
हे मात्रुभूमी,
तुझा जिव्हारी लागत जाणारा
विरह सहन होत नाही....