Pages

Wednesday, November 7, 2018

सये तुझे येणे...

पावसाची पहिली सर तू जसा मृदगंध
सये तुझे येणे प्राजक्ताचा सुगंध
कृष्ण मेघ ते भरून येता
माझं मन जणू चिंब चिंब
तुझ्या नाजुक अबोलीचा दरवळ
क्षणांत नेतो माझे 'मी' पण
ओंजळीत मी भरतो भरभर
कितेक क्षण ते हळवे सुंदर
तुझ्या सावळ्या रंगात मी
विसरून जातो त्या कळ्या अन पाकळ्याही
तुझ्या माझ्या डोळ्यांत पाणी
पाचोळ्यावर धुंद तराणी
या झुळुकेशी गुजगोष्टी किती
सांग सये तू येशील ना?

Saturday, September 22, 2018

घन तिमिराचे कृष्ण मेघ


घन तिमिराचे कृष्ण मेघ मज
नेती आठवणींच्या तळ्याकाठी
निबिड रानी हरित पालवी
निशब्द आसवे हितगुज करती

आशा निराशेची  सर दाटली
हिरवी शेते डोलणारी
अविरत राबे ती माय माउली
ध्यास तिचा सारे पिलापायी

क्षितीजावरचे  इंद्रधनु मग
उगाच वेडी आशा लावी
कसे कुठे ते सूर गवसले
सत्य असे कि भास कवडसे

नित्य खेळ हा उषा तिमिराचा
मार्ग नसे ना दिसे कोणता
रंग छटा मग साद घालिती 
पहाट  होई नवं सृजनाची

Sunday, October 2, 2011

पुन्हा

इंद्रधनुचे रंग आज नवखे वाटले 
इतके सुरेख ते कधीच नाही दिसले 
आकाश असे निळे निळे पाहताना 
मन खुले 
एक एक थेंब हि मग बरसताना
वाटे आपलासा 
कवितेच्या वहिवरची मी पाने उलटली 
भावनांनी ओथंबलेली 
किती दिवस मन काही बोलत कसे नव्हते? 
तराणी जुनीच आळवत  होते?
त्या नव्या पाना-फुलांनी सजलेले रोपटे 
काहीच कसे डोलत नव्हते?
आज मात्र पावसाचे एक गाणेच ऐकू येत होते 
कवितेच्या वहीचे एक नवीन पान
पुन्हा भावनांनी भरत होते!


Tuesday, April 5, 2011

मोरपंखी क्षितिजावर

मोरपंखी  क्षितिजावर  आज  एक  वेगळीच  लाली
जुन्या  आठवणींची  त्यास  अबोध  खोली
मन  भटका  वाटसरू  एखादा
उन्हात  अवेळी  फिरणारा
कविता  त्याची  अगोड  शिदोरी  निकडीची
पाखराचा तो  जीवघेणा चित्कार
भेसूर  कसा  तो  वाटेना
मनाचे  नेहमीचेच हे असे  रडे
वेगळे काय त्यात?

बोच  छळणारी कुठलीतरी
संपलेल्या  वाटेवर  आशेची  कांडी पुन:  पुन्हा  फिरणारी
नभ  असे  नवीन  का  भासत  नाहीत  कधीच
कि  मीच  ते  नाविन्य  शोधू  शकत  नाही?
काय  हे,  पुन्हा  आला  तो
पाऊस  नवी  कहाणी  घेऊन
तीच  नवी आशा  आणि  नवी  तराणी घेऊन
मन  भटका  वाटसरू  गेला  गोंधळून  
पाहतो  पुन्हा  फुटतात  का  ते  पोपटी  धुमारे म्हणून

Saturday, March 5, 2011

स्वप्नंच ते रेशमी

आतुर संध्याकाळी
परीकथेतील  राजकुमाराचे स्वप्न मनी

सुंदरशा  मरुद्यानी
उमललेली ती  गुलाबी कळी

स्वप्नी दिसली
इंद्रधनुचे  छत असलेली पर्णकुटी

शुभ्र अश्वावरी स्वार
तो वीर निनावी

नील आभाळी
शुभ्र ढगांची दुलई

पाहू कसे मुख कमल त्याचे
स्वप्नंच ते रेशमीWednesday, March 2, 2011

हे नीलकंठा

त्रिनेत्री  ज्वाळा रुद्राक्ष गळा 
हे नीलकंठा, उमावेल्हाळा

करी प्राशन हे दु: ख हलाहल
अर्पण तुला बेल, सफेद ते फूल

मी कलाकर य: किंचित
हे नटराजा ठेव तुझा वरदहस्त

या मनीची अथांग गुंतागुंत
तूच एक करी मुक्त

नमन तुज विनयेन
तुझे पायी ठेवीन डोई
भक्त तुझा मी शोभेन

हे नीलकंठा,
आणि काय मागू आता

भोळ्या भक्ताचा तूच दाता, त्राता!Saturday, February 5, 2011

सुकली पाने गोळा करताना

सुकली पाने गोळा करताना
मन हळवे झाले

चाकोरीचे तेच ठसे
पुन्हा गडद झाले

ढगांच्या चंदेरी काठावर
जुने स्वप्न हसले

तेच नित्याचे गाणे
जात्या वरती रुळले

नव्या रंगाची आस आणि
नवे जग कथा बनुन राहिले

नव्या आशंच्या हिंदोळ्यावर
पुन्हा झुलायचे ठरले

सुकली पाने गोळा करताना
मन पुन्हा हळवे झाले